Sunday, December 25, 2016

तबल्याच्या संबंधित काही व्याख्या

१. संगीत : गायन,वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित कलेला "संगीत" असे म्हणतात.

२. ताल : एक विशीष्ठ बोल समूह ज्याची रचना टाळी,सम,काल आणि खंड यांची निश्चिती करून तयार केली जाते त्याला "ताल" असे म्हणतात.

३. सम : कोणत्याही तालाच्या "पहिल्या मात्रेस" सम म्हणले जाते. टाळी ही सर्वसामान्यपणे समेवर असते.

४. टाळी : ताल हा खंडांमद्धे विभागलेला असतो. ताल हातावर देताना स्वतंत्रपणे खंड दाखवायचा झाल्यास "टाळी" चा उपयोग केला जातो. सामान्यपणे प्रत्येक खंडाच्या पहिल्या मात्रेस टाळी येते. (कालाच्या सोडून)

५. काल : ताल हा सम भागात विभागलेला असतो साधारणपणे अर्धा ताल संपल्यावर येणार्‍या पहिल्या मात्रेस "काल" म्हणतात. हात टाळी च्या ऐवजी एका बाजूला हवेत फिरवून काल दर्शवतात.

६. लय : दोन मात्रांमधील समान अंतरास "लय" असे म्हणले जाते. लयीचे ३ प्रकार आहेत
१. विलंबित २. मध्य   ३.द्रुत    

७. खंड : वर सांगितल्या प्रमाणे ताल हा सम भागात विभागला जातो. त्या प्रत्येक भागात काही बोलांचा अपूर्ण समूह असतो त्या प्रत्येक समुहास "खंड" असे म्हणतात. खंड हे मात्राना अनुसरून बनवले जातात.

८. मात्रा : मात्रा म्हणजे "ताल मोजण्याचे" साधन. प्रत्येक तालामध्ये असलेल्या बोलाला "मात्रा" म्हणतात.

९. तिहाई : कोणताही बोल समूह एका आवर्तनामध्ये ३ वेळा वाजवल्यास त्याला "तिहाई" म्हणतात. सामान्यपणे तिहाई चा शेवट "धा" वर होतो.

१०. कायदा : विशीष्ठ बोलांची रचना जी मात्रा,टाळी, काल,खंड यांना अनुसरून बनवली जाते त्याला "कायदा" असे म्हणतात.

११. आवर्तन : कोणताही ताल अथवा बोल समूह सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाजवला अथवा म्हणला तर ते एक "आवर्तन" मानले जाते.

१२. दुप्पट : प्रत्येक ताल किंवा ठेका एका लयीत वाजवला जातो. त्याचा लयीमध्ये एका मात्रेच्या वेळात २ मात्रा वाजवणे याला "दुप्पट" म्हणतात.

(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

तबला स्वराला लावणे

तबला स्वराला लावणे ही एक अवघड गोष्ट मानली जाते. बर्‍याच जणांना तबला वाजवता येत असला तरी तो स्वराला लावता येत नाही. याचे कारण म्हणजे उपजतच स्वरज्ञाना चा अभाव. आपण कोणत्याही स्वराला तबला लावू शकतो. त्यासाठी पेटी वर स्वर चालू ठेवावा. स्वराला लावण्यासाठी तबल्याच्या लवेवर आघात करणे गरजेचे आहे. तबल्याच्या गठ्या वर वरच्या बाजूला आघात केला तर गठ्ठे खालच्या बाजूला सरकून तबल्याचा स्वर चढतो तर गठ्ठे वर घेतल्यास खालचा स्वर लागतो. पेटी आणि तबल्याच्या स्वराचा अंदाज घेऊन पुढील प्रक्रिया करावी. तबल्याची वादी जिथे बसवलेली असते त्यांना घरे म्हणतात. पहिल्यांदा कोणतेही एक घर निवडावे आणि स्वराला लावून घ्यावे. त्यानंतर त्याच्या अगदी विरुद्ध घर घेऊन ते स्वराला लावावे. नंतर परत दुसरे घर स्वराला लावून घ्यावे आणि त्याच्याही विरुद्ध घर स्वराला लावावे. असेच अनुक्रमे सर्व घरे स्वराला लावावीत. हातोडीने गजर्‍यावर हलका वार केल्यास किंचित फरक ही नाहीसा करता येतो.

तसेच डग्गा लावताना खर्ज चे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. खर्जा चा स्वर वाजवून अंदाज घ्यावा आणि डग्गा देखील स्वराला लावून घ्यावा. पहिल्यांदा च स्वराला लागेल याची शाश्वती थोडी कमीच. पण याचा ही सराव केल्यास अशक्य नाही.









(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

Saturday, December 24, 2016

तबल्याची घराणी : भाग ३



बनारस घराणे : लखनौ घराण्याचे उ.मोदु खान यांचे शिष्य पं.राम सहाय (१८३० -१८८६) हे या घराण्याचे प्रवर्तक. या घराण्यावर पखवाज वादन शैलीचा प्रभाव आढळतो. "दुर्गा परण , काली परण , रासलीला परण, कृष्ण परण" अश्या काही खास रचनाचे वादन या घराण्यात केले जाते.
वेगवान तबला वादनाला प्राधान्य तसेच हाताच्या संपूर्ण पंजाचा वापर करून धिरधीर किट हे बोल वाजवले जातात.  "धिग ,धिना , धीट , तिट , घेघेनक , केकेनक, नगनग,कत तिरकट,कत्ता कत्ता, गदिगन, धिरधीर किटतक, तुना किटतक " हे बोल प्रामुख्याने वाजवले जातात. 



पंजाब घराणे : पं.लाला भवानीप्रसाद पखावजी हे या घराण्याचे आद्य प्रवर्तक. दिल्ली घराण्याचे उ. सिद्धार खान आणि पंजाब घराण्याचे पंडित भवानीप्रसाद हे समकालीन. पंजाब मध्ये टुककड नावाचे वाद्य प्रसिद्ध होते जे तबल्यासारखेच दोन भागात विभागले होते. पं. भवानी प्रसाद यांनी या वादयावर नवीन बाजाची निर्मिती केली आणि तबल्यात रूपांतर केले. या घराण्याच्या वादन शैली मध्ये अतिशय वेगात तबला वाजवला जात असल्यामुळे आकर्षक आणि श्रोत्यांना प्रभावित करणारा बाज निर्माण होतो. आपल्या सर्वांना परिचित असे उ. अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उ. झाकीर हुसैन हे पंजाब घराण्याचे होत.



(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)

संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

तबल्याची घराणी : भाग २

३. लखनौ घराणे : लखनौ घराणे "पूरब घराणे" म्हणून देखील ओळखले जाते . दिल्ली घराण्याचे उ. सिद्धार खान यांचे नातू उ. मोदु खान आणि उ. बक्षू खान यांनी या घराण्याची स्थापना केली. दिल्ली वरील नादीर शहा च्या हल्ल्यानंतर हे दोघे लखनौ ला स्थायिक झाले. त्याकाळात लखनौ मध्ये कथ्थक चा प्रसार आधीच झालेला होता त्यासाठी पखवाज वापरला जाई. तबला माहिती च नसल्यामुळे या दोघांना त्याचा प्रसार करणे फार अवघड गेले नाही. पखवाजाचा खुला बाज जो कथ्थक साठी वापरत असत तो त्यांनी बंद बाजाच्या स्वरुपात तबल्यामद्धे आणला. प्रामुख्याने गत आणि परण हे तबला वादनामध्ये समाविष्ट करण्यात आले.
या घराण्यात मुख्यता "तगेन्न,धेतधेत, क्ड्धे ,तिट , किटतक, घेत्ता, धिडनग" या शब्दांचा वापर केला जातो.


४.  फरूखाबाद घराणे : उ. हाजी विलायतअली खान हे या घराण्याचे प्रवर्तक. असे म्हणले जाते की एकदा उ. सलअली खान यांनी लखनौ घरण्याच्या उ. बक्षू खान यांना गत मध्ये हरवण्यासाठी आव्हान दिले. तेव्हा उ. बक्षू खान यांनी उ. हाजी विलायत अली खान यांना विनंती करून हे आव्हान स्वीकारण्यास संगितले. जवळपास १५ दिवसांच्या या सांगीतिक युध्हा नंतर शेवटी विलायत अली खान यांनी काही अशी गत वाजवली जी सलअली  खान यांना नाही वाजवता आली आणि विलायत खान यांचा विजय झाला. याची भेट म्हणून बक्षू खान यांनी आपली मुलगी आणि काही नजराणे भेट दिले ज्यामधे ५०० अद्वितीय तबला रचना होत्या.
 या घराण्याच्या वादन शैली चा प्रभाव मुख्यत्वे कलकत्ता , मेरठ , महाराष्ट्र, गोवा हैदराबाद , इंदूर इ. प्रांतात आढळतो. या घराण्याचा तबला शुद्ध मानला जातो. स्वतंत्र वादना मध्ये कायदे आणि पेशकरांचा समावेश आढळतो. तसेच गतींमध्ये तकतक-धिरधीर या शब्दांचा अधिक वापर आढळतो. क्डान-घ्डान, धिरधीर किटतक, घेत , तकतक,नगनग इ. शब्दांचा समावेश या घराण्यात आढळतो. मधुर आणि संतुलित वादन या घराण्याचे वैशिष्ठ्य समजले जाते.        


(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

Friday, December 23, 2016

तबल्याची घराणी : भाग १

तबल्याची ६ मुख्य घराणी आहेत

१. दिल्ली घराणे २. अजराडा घराणे 
२. लखनौ घराणे ४. फरूखबाद घराणे
५.बनारस घराणे ६. पंजाब घराणे 

प्रत्येक घरण्यांनुसार आपण त्यांचा संक्षिप्त परिचय पाहू.

१. दिल्ली घराणे :  हे तबल्याचे सर्वात पुरातन आणि प्रथम घराणे मानले जाते. उत्तर-पूर्व भारतात या घराण्याचा जास्त वारसा आढळतो तसेच आत्ताच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे हे घराणे आहे. दिल्ली घराण्याची स्थापना १८ व्या शतकामध्ये उस्ताद सिद्धार खान धाडी यांनी केली. ज्यांना तबल्याचे निर्माते अथवा आद्य प्रवर्तक असे मानले जाते. मुळात सिद्धार खान हे पखवाज वादक होते त्यांनी पखवाजातील जवळ जवळ सर्व बोल तबल्यावर कसे वाजवता येतील या कडे पाहिले. तबल्यातील काही प्रमुख संकल्पना उदाहरणार्थ कायदा तसेच पेशकार यांच्या रचनेमध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे. या घराण्यात प्रामुख्याने पेशकार, रेले , कायदे यांचे वादन केले जाते."धीट,तिट,किट,धागेना,तागेना,तिनकिन,धिनगिन,धिरधिर" या बोलांचा मुख्यता वापर केला जातो. कायदे हे साधारण चतस्त्र जातीचे असतात. तबला व डग्गा यामधून कोमल नाद निर्माण केला जातो ज्याचा वेग खूप जास्त असतो. साथसंगत आणि स्वतंत्र तबला वादना साठी हे खूप उपयुक्त असे घराणे आहे.



२. अजराडा घराणे : दिल्ली घराण्याचे उ. सिताब खान यांचे शिष्य उ. मिरू खान व उ.कल्लू खान यांनी हे घराणे १९ व्या शतकामध्ये स्थापन केले. उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्ह्यामध्ये अजराडा नावाचे हे गाव जिथे उ.मिरू खान आणि उ.कल्लू खान स्थायिक झाले. दिल्ली घराण्याच्या गुरु परंपरेमुळे अजराडा आणि दिल्ली घराण्याच्या वादन शैली मध्ये विशेष असा काही फरक जाणवत नाही. पण या दोन्ही उस्ताद लोकांनी आड लईतील एक विशिष्ठ शैली विकसित केली आणि कायदे सुद्धा तिस्त्र जातीमधे बांधले. वादन शैली पहायची झाल्यास यामध्ये अंगठ्या जवळ चा मांसल भाग एका विशीष्ठ पद्धतीने डग्ग्यावर घासला जातो. ज्यामुळे एक विशीष्ठ प्रकारचा नाद तयार होतो जो आकर्षक वाटतो. हे या घराण्याचे वैशिष्ठ्य. या मध्ये प्रामुख्याने "घेतक, धिगन, तित, कत" या बोलांचा वापर आढळतो. अनवट कायद्याची रचना या घराण्यात आढळते. त्यामुळे या घराण्यातील स्वतंत्र तबला वादन अवघड मानले जाते. 










(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)

संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

तबल्याचा इतिहास

तबल्याचा इतिहास


भारतीय शास्त्रीय संगीतात तबल्याला मानाचे स्थान आहे पण तबला मुळात निर्माण कसा झाला याबाबत खात्रीशीर माहिती कुठेही उपलब्ध नाही. अनेक आख्यायिका तबल्याच्या निर्मिती विषयी सांगितल्या जातात. त्यातीलच एका प्रमुख आख्यायिकेनुसार मृदंग किवा  पखवाजाचे कापून दोन भाग करण्यात आले व या दोन भागांचे तबल्यात परिवर्तन झाले. असा एक समाज आहे.
तबला हे भारतीय वाद्य नसावे कारण पर्शियन प्राचीन ग्रंथात "तबल-अल्गाविग,तबलजंग,तबला टर्की, तबलसामी-मिरगी, तबलबलादी" या वाद्यांचा समावेश आढळतो. त्यामुळे हे वाद्य भारता बाहेरून आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
इ.स. १२९६-१३१६ काळात अल्लाउद्दीन खिलजी च्या राज्यात "अमीर खुसरो" नावाचा एक अतिशय प्रतिभाशाली कलाकार होता. त्याने पर्शियन , इराणी आणि अफगाणी संगीताला भारतीय संगीताची जोड दिली आणि नवीन ठेके आणि वाद्यांची भर घातली. म्हणून अमीर खुसरो याने तबल्याची निर्मिती केली असे म्हणतात.
पण महाराष्ट्रामद्धे सुद्धा काही प्रचलित वाद्ये आढळतात जस की संबळ चौघडा. तसेच पुरातन शिल्प आणि चित्रांमधून सुधा तबला आढळून येतो त्यामुळे या वाद्यांचे परिवर्तन होऊन तबला निर्माण झाला असावा असा एक अंदाज आहे.

(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)

संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

Thursday, December 22, 2016

.तबल्याची बैठक आणि रियाज (सराव)

तबला बैठक


नवीन तबला शिकणार्‍यांसाठी बैठकीची पद्धत
तबला वाजवताना सामान्यपणे मंडी घालून बसावे. समोर तबला उजव्या हाताला आणि डग्गा डाव्या हाताला थोडेसे अंतर ठेऊन मांडावा. तबला पुढच्या बाजूला किंचित तिरका तर डग्गा सरळ ठेवावा. डग्ग्याचे मैदान मोठा भाग आपल्या बाजूस ठेवावा व शाई चा भाग समोरील बाजूस ठेवावा.


रियाज (सराव) : कोणत्याही गोष्टीतील सातत्य आपल्याला यशाच्या जवळ नेते. तसेच उत्तम तबला वादक होण्यासाठी सातत्याने सराव आवश्यक आहे. सराव करताना काही गोष्टी  विचारात घेणे महत्वाचे आहे.

१. रियाजसाठी एक वेळ ठरवून घ्यावी. (पहाटे केलेला रियाज उत्तम)
२. काळी १ स्वराचा तबला रियाजसाठी उत्तम
३. योग्य लेहरा घेऊन रियाज करावा.

४. बोल स्पष्ट वाजवण्याचा प्रयत्न करावा आणि वाजू लागल्यावर लय वाढवावी.
५. रियाज करताना बोल तोंडाने म्हणावेत (वाजवत असताना बोल म्हणणे कठीण असले तरी अशक्य नाही) 


(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)

संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

तबला - परिचय : १

तबला हे वाद्य मुळात दोन भागामध्ये विभागल जात . 'तबला' व 'डग्गा' मिळून "तबला" हे (एक) ताल वाद्य तयार होते. भारतीय संगीतात तालाला फार महत्व आहे. सध्या अनेक वाद्ये अस्तीत्वात आहेत. पण त्यामध्ये तबल्याला अधिक महत्व आहे. तबला हे वाद्य चामड्याचा वापर करून बनवले गेले आहे त्यामुळे त्याला चर्म वाद्य अथवा अवनद्ध वाद्य असे ही म्हणतात. तबला हे लयप्रधान वाद्य असून शास्त्रीय संगीतात त्याचा साथी साठी आणि स्वतंत्र तबला वादना साठी वापर केला जातो.

आपण आता तबल्याच्या विविध भागांची माहिती घेऊ

तबल्याच्या काही महत्वाच्या भागांपैकी "खोड,वादी,गठ्ठे,पुडी" हे मुख्य भाग

१. खोड : तबल्याचे खोड हे खैर , शिसव , बाभळी च्या लाकडापासून मुख्यत: बनवले जाते. त्याच्या तोंडाचा व्यास ५ ते ७ इंच असतो तसेच त्याची ऊंची साधारण ११ इंच असते.
२. वादी : वादी ही चामड्यापासून बनवली जाते. साधारण १५ ते २० मिटर लांब असते.
३. गठ्ठे : तबल्याला एकूण ८ गठ्ठे असतात. ते मुख्यत: सागवानापासून बनवले जातात. गठ्ठे साधारण २ इंच लांब असतात.
४.पुडी : पुडी हा तबल्याचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. पुडी मुळे च नाद तयार होतो. पुडी सुद्धा विशिष्ठ चामड्यापासून बनवली जाते. पुडी ही तबल्याच्या तोंडावर वादीच्या सहाय्याने बसवली जाते. "गजरा,चाटी,लव " हे काही उपभाग पुडी मध्ये येतात.
५. शाई : शाई ही पुडीच्या मध्यभागी स्थित असते. लोखंडाचा कीस , कोळ्श्याची पुड आणि खळ यांचे मिश्रण म्हणजे शाई.तबल्याची शाई ही मध्यभागी असते तर डग्ग्याची एका बाजूला असते.
६. भांडे : भांडे हे डग्ग्यासाठी वापरले जाते. हे भांडे पितळ अथवा तांब्या पासून बनवले जाते.
(डग्ग्यासाठी चे भाग हे तबल्याप्रमाणे च असतात फक्त भांडे वेगळे असते)

तबला वादनात काही मुख्य अक्षरांचा समावेश आहे त्याला वर्ण किंवा बोल असे म्हणतात. प्रामुख्याने वर्ण १०  आहेत.  ते "क, ख, ग, घ, ट, ड, त, थ, द, ध, न" असे आहेत आणि ते  तबला व डग्ग्यानुसार विभागले जातात.
या अक्षरांचे ३ वर्ग आहेत
१. महाप्राण २. अल्पप्राण  ३. सर्वसाधारण वर्ण

१. महाप्राण : धा, धिं, धे  ही अक्षरे तबला व डग्ग्या वर मिळून वाजवली जातात तसेच टाळी च्या ठिकाणी हि यांचा वापर होतो.
२. अल्पप्राण : त, ता, ती, तू, न, ना ही अक्षरे काल दर्शवण्यास मदत करतात.
३. सर्वसाधारण वर्ण : ट, ड, र, दिं, थों, थुं, ग, गी, गे, घी, घे, घु, क, का, की, कत, तत्, डा, घेत, इत्यादी अक्षरे महाप्राण व अल्पप्राण सोडता सर्व ठिकाणी येतात.  

१. तबल्याच्या चाटेवरील वर्ण
न,   ना,   त,   ता,   धा 

२. तबल्याच्या शाई वरील वर्ण
कीं, धि, ड, डा, धेत, ट, र, तत 

३. तबल्याच्या लवे वरील वर्ण
धी, ती, थों, थूं, तीं, तु 

४. डग्ग्याच्या लवे वरील वर्ण
धा, धी, ग, गा, गी, गे, थूं, धूं

५. डग्ग्याच्या शाई वरील वर्ण
क, की, कत

६. जोडाक्षरे किंवा जोडवर्ण
त्र, त्रक, त्रकड़, क्ङाँ, घ्ङाँ, ग्डांँ, ध्डाँ 



(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य  : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)